करोना व्हायरस -लेख

सर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे.


आज एका विषाणूने अख्ख जग वेठीस धरलंय. याचा प्रादुर्भाव झपाट्याने होतोय. सरकार हताश झालंय. याचा प्रसार थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन शिकस्त करतंय. डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. या एका विषाणूने जगाच्या सीमा धूसर केल्यात. उच्च-नीच, जात- पात-धर्म सगळं काही याने विसरायला लावलंय.


जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले. त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा धार्मिक प्रगतीसाठी किंवा कोणा एकट्याच्या हितासाठी असे आवाहन केले नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी केले. या विषाणूबाबत गांभीर्य लोकांना कळावे हा त्यामागचा उद्देश होता.


जगावर हे संकट चीनमुळे आले आहे हे आता सिद्ध झालेय. याचे उगमस्थान चीनमधील वुहान शहर आहे हे आता सर्वश्रुत आहे. चीनच्या हलगर्जीपणामुळे हा रोग संपूर्ण जगात पसरला. चीनने या विषाणूबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवली याचा चीनला खेद ना खंत वाटत आहे. उलट कम्युनिस्ट चीन आपल्याकडील गोपनीयतेच्या भिंती किती मजबूत आहेत यावर खुश होतोय. चीनच्या दडपशाहीच्या आणि क्रूरतेचा बातम्या अनेक वेळा आपल्या कानावर पडल्या आहेत. पण याविषयी  चीनला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणत्याही देशात नाही. कदाचित चीन यूएनएससी चा सभासद असल्यामुळे कोणी असे धाडस करत नसावे. अतिशय कमी किमतीच्या वस्तू पुरविण्यात चीनचा हातखंडा असल्यामुळे चीन आर्थिक वर्चस्व ठेऊन आहे आणि व्हिटो पॉवर सुद्धा त्यांच्या बाजूने मिळू शकते.


या विषाणूचे नाव कोरोना असे पसरविण्यात चीनला यश आले आहे. सतत या नावाचा उल्लेख करून जग सुद्धा याला कोरोना या नावानेच ओळखू लागले. हे दुसरे तिसरे काही नसून चीनचा परराष्ट्र विषयक धोरणाचा विजय म्हणावा लागेल. या विषाणूला जग चीनमधील शहराच्या नावाने ओळखू नयेत हीच चीनची इच्छा होती. ज्या प्रांतातून हा पसरला त्या प्रांताचे नाव या विषाणूला गेले असते तर चीनचे नाव खराब झाले असते. खरंतर हुबे किंवा वुहान हेच नाव असायला पाहिजे होते. या नावामुळे लोकांच्या मनात सतत चीनचे नाव घोळत राहील आणि चीनला काही दिवसानंतर बाजारपेठ मिळणे दुरापास्त होईल आणि चीनमध्ये आर्थिक मंदी येईल याची चीनला खात्री होती. यामुळेच चीनने अतिशय धूर्तपणे या साथीच्या रोगाला अमेरिकेला जबाबदार धरून त्यांनी हा रोग पसरविल्याचे आरोप केले. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले. परंतु यामध्ये ट्रम्प यांचे म्हणणे अधिक तर्कसंगत वाटले.


रोगांची किंवा विषाणूंची नावे ठेवताना ती अश्याप्रकारे निवडली जातात की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा त्याच्या नावावरून सहज त्याची लक्षणे आणि उगम समजू शकेल. यापूर्वी अनेकवेळा व्हायरस, रोग आणि सिंड्रोम यांची नावे त्यांच्या मूळ ठिकाणांवरून किंवा त्यांच्या उगमस्थानावरून ठेवण्यात आली होती. सिंगापूर इअर, यलो फिवर, स्पॅनिश फ्लू मंगोलियन सिंड्रोम, मंगोलियन स्पॉट, जर्मन गोवर, जपानी एन्सेफलायटीस, वेस्ट नाईल व्हायरस, स्वाइन फ्लू, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, सार्स ही काही वानगीदाखल उदाहरणे देता येतील. जर हे सर्व रोग त्यांच्या मूळ ठिकाणांच्या नावावरून ठरवले गेले तर मग कोविद - १९ हे नाव का? वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस असे त्याचे नाव का नाही?


कोरोनाच्य ऐवजी त्याला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस असे नाव दिले तर त्याची सामान्य ओळख न राहता स्वतःची अशी एक विशिष्ट ओळख त्याला मिळेल. कारण कोरोना हा अनेक विषाणूंचा समूह आहे. यात इन्फ्लूएंझा व्हायरस, सार्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लूचा समावेश आहे. त्यामुळे या विषाणूला विशिष्ट नाव ठेवले तर त्याचे डिकोडिंग करणे आणि त्याला ओळखणे सोपे जाईल.